आषाढी वारी पंढरपूर

आषाढी वारी पंढरपूर वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणारे लोकांचा संप्रदाय.या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे आषाढी वारी.या वारीमध्ये अनेक जाति- धर्माचे लोक तसेच मराठा,महार, लिंगायत व इतर जातीचे भाविक भक्त सुध्दा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी हा एक आनंदी सोहळा असतो.पायी केली जाणारी वारीची परंपरा बरीच जुनी आहे.संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करुन घेतले.हेच व्यापक स्वरूप  जपत पुढे एकनाथ महाराज , तुकाराम महाराज, शंकर स्वामी शिऊरकर महाराज संतांनी वारीची परंपरा चालवली.संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.